Posts

Showing posts from January, 2019

पाकीट

          आज सकाळी बस मधून येताना माझ्याकडे दहा रुपयांचं एक नाणं होतं आणि एक नोट! मला तिकिटासाठी फक्त दहाच रुपये लागणार होते. खरंतर एवढ्या गर्दीत आपण फारसा विचार करत नाही पण तरी माझ्या डोक्यात आलंच, 'जर  हे नाणं बॅगेच्या कोणत्यातरी कोपऱ्यात जाऊन बसलं तर नंतर कदाचित सापडणारच नाही गरजेच्या वेळी; त्यामुळे आत्ता समोर दिसतंय तोपर्यंत तेच देऊन टाकू, ही नोट नंतर वापरता येईल.' या विचाराने मी ते नाणं देऊन तिकिट घेतलं. मला उगीचच त्या वेळेला हे सुचल्याचं फार छान वाटत होतं.           मी बस मधून उतरले आणि ती दहा रुपयांची नोट बॅगेत टाकण्यासाठी चेन उघडली. त्या क्षणाला त्या कप्प्यातल्या सगळ्या गोष्टी, सामान बघून असं लक्षात आलं की ही नोट इथं ठेवली तर एक दोन दिवसांतच फाटून जाईल. त्यानंतर ती आपल्याला समोर दिसत असूनही वापरता मात्र येणार नाही. तेवढ्यातच मनात आलं, अरे... आपण नोट द्यायला हवी होती. नाणं तर कितीही दिवस आपल्याकडे राहू शकलं असतं. आता मी पूर्णपणे गोंधळले होते. कारण मागच्या काही मिनिटांपूर्वी जी गोष्ट मला अगदी योग्य वाटत होती, काही वेळातच ती गोष्ट मला चुकीची वाटायला लागली होती.