पाकीट

          आज सकाळी बस मधून येताना माझ्याकडे दहा रुपयांचं एक नाणं होतं आणि एक नोट! मला तिकिटासाठी फक्त दहाच रुपये लागणार होते. खरंतर एवढ्या गर्दीत आपण फारसा विचार करत नाही पण तरी माझ्या डोक्यात आलंच, 'जर  हे नाणं बॅगेच्या कोणत्यातरी कोपऱ्यात जाऊन बसलं तर नंतर कदाचित सापडणारच नाही गरजेच्या वेळी; त्यामुळे आत्ता समोर दिसतंय तोपर्यंत तेच देऊन टाकू, ही नोट नंतर वापरता येईल.' या विचाराने मी ते नाणं देऊन तिकिट घेतलं. मला उगीचच त्या वेळेला हे सुचल्याचं फार छान वाटत होतं.
          मी बस मधून उतरले आणि ती दहा रुपयांची नोट बॅगेत टाकण्यासाठी चेन उघडली. त्या क्षणाला त्या कप्प्यातल्या सगळ्या गोष्टी, सामान बघून असं लक्षात आलं की ही नोट इथं ठेवली तर एक दोन दिवसांतच फाटून जाईल. त्यानंतर ती आपल्याला समोर दिसत असूनही वापरता मात्र येणार नाही. तेवढ्यातच मनात आलं, अरे... आपण नोट द्यायला हवी होती. नाणं तर कितीही दिवस आपल्याकडे राहू शकलं असतं. आता मी पूर्णपणे गोंधळले होते. कारण मागच्या काही मिनिटांपूर्वी जी गोष्ट मला अगदी योग्य वाटत होती, काही वेळातच ती गोष्ट मला चुकीची वाटायला लागली होती.
          इथं प्रश्न त्या नाण्याचा किंवा त्या नोटेचा नव्हताच बहुदा; मी घेतलेल्या निर्णयाचा होता. वास्तविक बघता ते नाणंही तांबेरलेलं नव्हतं आणि ती नोटही फाटत आलेली नव्हती. दोन्हीही चांगल्या स्थितीत होते आणि त्यांची किंमत पण सारखीच होती. फरक फक्त एवढाच होता की त्याक्षणी मी कोणत्या गोष्टीकडे जमेची बाजू म्हणून बघतेय!
          आपल्या विचारांचही असंच असतं ना... काही नाणी असतात आणि काही नोटा! किंमत सारखीच, तरीही आपल्यापुढं वेगवेगळे  पर्याय म्हणून उभे राहतात आणि पुरतं  भांबावून सोडतात. या एखाद्या सेकंदाला त्यांच्यातलं एकाचं पारडं जड झाल्यासारखं वाटतं आणि आपण भविष्यासाठी एखादा निर्णय क्षणार्धात घेऊन टाकतो. काही दिवस, किंवा वर्षांनी आपल्याला दुसरा विचार महत्वाचा असल्याचं जाणवतं. मग आयुष्य पुन्हा एकदा त्याच तराजू समोर उभं राहतं.
          आता यात पण गंमत अशी आहे  जर ते नाणं आणि ती नोट त्यावेळी एखाद्या पाकिटात आपापल्या जागी असते तर एवढा गोंधळ झाला नसता. जे पहिल्यांदा समोर आलं असतं ते  काढून दिलं असतं. कारण दुसरी गोष्ट ती नाणं असो किंवा नोट... माझ्याकडे तेवढीच सुरक्षित राहिली असती. नंतर गरजेला ती सापडलीही असती आणि वापरही झाला असता.
          बहुतेक हेच कारण असावं आयुष्याच्या प्रत्येक नव्या टप्प्यावर दोन पर्यायांच्या पेचात अडकून पाडण्याचं. आपले विचार जे एका वेळी सगळे नसले तरी तेवढेच महत्वाचे आहेत, प्रत्येकाला  स्वतःची अशी किंमत आहे ते आपल्याकडे सुरक्षितपणे, व्यवस्थितपणे राहतायत का? आपल्यापैकी खूप जण नोटांसाठी, पैशांसाठी चांगलं पाकीट वापरतही असतील. पण तेवढंच सुरक्षित, नीटनेटकं बुद्धीचं पाकीट आणि अगणित नोटांएवढ्या किंमती विचारांना लागणारी जागा, मोकळीक त्या पाकिटात आपण देतो का?
          आपण या विचारांना लागणारं आवरण त्यांना वेळोवेळी दिलं नाही तर ते फाटून जातील किंवा दिसणारच नाहीत. पण याउलट जर त्यांना पद्धतशीर कप्पे करून त्यात जागा दिली तर हवा तेव्हा हवा तो विचार न गोंधळता बाहेर काढता येईल... अगदी त्या दहा रुपयांसारखाच!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पेरू

दुसरी बाजू

कलेक्शन