दुसरी बाजू

          कोणतीही घटना, प्रसंग असो किंवा चर्चा असो; प्रत्येकाला त्यासंबंधित 'मत' मांडण्याची अगदी तीव्र इच्छा असते. हा मानवी स्वभावाचा भाग असावा कदाचित. पण त्यामुळे "मला  काय वाटतं..." असं म्हणत प्रत्येकजण समोरची परिस्थिती ठरवायला जातो. याहीपलीकडे तेच बरोबर असल्याचंही  पटवून देत राहतो, अगदी पुराव्यांसहित. पण कित्येकदा समोरच्या घटनेला दुसरी बाजू असते... आपल्या विचारांच्या कितीतरी पलीकडची; विचार करायला लावणारी! जर्मनीमध्ये असताना एका प्रवासात मला असाच अनुभव आला.                     
           प्रसंग काही मिनीटांचाच... ट्रेन मध्ये मी आणि माझ्या टीम मधील तीन जण एकत्र बसलो होतो. आमच्या गप्पा सुरु असताना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. पहिली दोन तीन मिनिटे आम्ही दुर्लक्ष केलं. पण त्यानंतरही रडणं थांबलं नसल्याने आम्ही आवाजाच्या  दिशेने पाहिलं. त्या डब्यातील मोकळ्या जागेत असलेल्या क्रेडल मधून बाळाच्या आवाज येत होता. आई तिच्या सीटवर असावी, पण आवाज ऐकून कोणीच उठताना दिसेना. आमचं असं काही सेकंदांचं निरीक्षण झाल्यावर आम्ही आमची चर्चा पुर्ववत सुरु ठेवली.        
          पण तो आवाज वाढला तसा आमच्याही नकळत आमच्या गप्पांचा विषय बदलला आणि 'ते रडणारं बाळ व त्याचे काहीही सोयर-सुतक नसणारी आई' यावर घसरला. म्हणजे त्याची आई कुठे आहे, कोण आहे हे जरी कळलं नसलं तरीही ती जबाबदार नाही हे कुठेतरी डोक्यात येऊ लागलं, सगळ्यांच्याच! तरीसुद्धा काहीतरी अडचण असू शकते, ती घेईल त्याला... हे आम्हीच स्वतःच्या मनाला समजावत राहिलो.
          तरी होतं काय माहिती आहे का, एखादं बाळ रडत असताना काहीच मिनिटं झाली तरी तो  वेळ खूपच वाटतो, आणि मग आपलीच घालमेल सुरु होते. त्यात तिथं आम्ही काहीच करू शकत नव्हतो. त्यामुळे जास्तच वाईट वाटत होतं. माझी मैत्रीण न राहवून शेवटी म्हणालीच, "अशी कोणती अडचण असेल कि एवढा वेळ बाळ रडत असूनही आई आली नाही, इथं असंच असतं का?" अनावधानाने का होईना पण तिला त्या आईचा राग आला. तेवढ्यातच झोपेतून उठलेला चार ते पाच वर्षांचा एक मुलगा त्या क्रेडल जवळ आला. त्याने बाळाच्या अंगावरून हात फिरवल्यावर ते काही क्षणांसाठी शांतही झालं. पण पुन्हा तेवढ्याच आवाजात, तेवढ्याच ताकदीने रडू लागलं. मग तो मुलगा त्याच्या सीट कडे गेला; त्याच्या आईला हलवून काहीतरी सांगितलं. त्यांची सीट पाठमोरी असल्यामुळे त्यांच्यात नक्की काय, कसं बोलणं झालं ते काही कळलं नाही. पण ती बाई लगेचच उठून बाळाकडे आली. तीनं त्याला कडेवर घेतलं. त्याचक्षणी त्याचा आवाज बंदही झाला. बघितलं तर त्याच्या डोळ्यांत पाण्याचा टिपूस सुद्धा दिसत नव्हता, छान हसत होतं ते. आम्हाला ते पाहून मजा वाटली आणि आनंदसुद्धा!                  आमच्या लेखी हा विषय संपला. नंतर विषय बदलत गेले, पण गप्पा सुरूच. कोणाला काय वाटतंय, कोणाचं पटतंय... काय असू शकतं वगैरे.                
          तेवढ्यात आमचं स्टेशन आलं. आम्ही सगळे ट्रेनमधून उतरलो. त्याच स्टेशनवर पुढच्या दराने ती आई दोन्ही मुलांना घेऊन उतरली होती. आमच्या इतर सहकार्यांना घडलेला प्रसंग सांगण्यासाठी आम्ही त्यांच्या कडे बोट दाखवलं. तो मुलगा त्या बाळाला गाणं म्हणत खेळवत होता. ती आई तिथेच एका ऑफिसरला हातवारे करून काहीतरी विचारात होती. तो तिच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. पण तिला काहीही कळत नव्हतं. शेवटी तिने त्याला खुणेनेच तीला  ऐकता व बोलता येत नसल्याचा खुलासा केला. त्या ऑफिसरनेही मग अगदी तुटक हातवारे करत तिच्या शंकांचं निरसन केलं. ती वळली. मघापासूनचं स्मितहास्य जराही ढळू न देता दोघांना घेऊन ती एका दिशेला चालू लागली. आणि शेजारची ट्रेन दुसऱ्या दिशेला. संपूर्ण स्टेशनच धावत होतं. स्तब्ध होतो ते एवढा वेळ बडबड करणारे फक्त आम्ही चार जण; दुसऱ्या बाजूचा विचार करत...!        

                                                                                                             






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पेरू

कलेक्शन