पेरू

          मघाशीच मी एक पेरू खाल्ला... आणि पहिल्यांदाच तो मला आवडला! हे पेरू नावाचं फळ औषधी, गुणकारी वगैरे असूनही कधीच फारसं बरं वाटलं नव्हतं. त्यात पण गंमत अशी की मला ते त्याच्या चवीमुळं नाही तर त्यातल्या भरमसाठ बिया आणि त्या खाताना होणाऱ्या त्रासामुळं आवडायचं नाही. आत्ता असं लक्षात आलं की हा पेरू नेहमीसारखाच आहे. चव पण तीच आणि बिया पण तेवढ्याच! फक्त यावेळी मी तो बियांचा त्रास न होऊ देता खाल्ला आणि तो खरोखर चांगला वाटला.
          हे खाता खाता अशा बाकीच्याही गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून सरकल्या... ज्यांच्या चवीशी माझं सुत जुळत असतानाही केवळ त्या खाताना त्रासदायक होतात म्हणून मी टाळत होते, त्या मला आवडत नव्हत्या. त्यात ऊस, आवळा अशा बऱ्याच गोष्टी... अगदी आंबासुद्धा!
          हसू आलं ना? ते स्वाभाविकच आहे म्हणा. कारण कोणताही पदार्थ हा त्याची चव न आवडण्यामुळे किंवा तशाच कोणत्यातरी भक्कम कारणांमुळे न आवडणे एक वेळ चालू शकेल. पण फक्त खाताना त्रास होतो म्हणुन... पण खरंच हे असं केलं मी आजपर्यंत.
          आता यापुढची आणखी एक मजा माहितेय का?... आपलं सगळ्यांचंच असं होतं अहो; फक्त खाण्याच्याच बाबतीत नाही तर इतरही गोष्टींत. अगदी आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांबाबतीतही! म्हणजे बघा हं, ते आपल्यातल्या आणि आपण त्यांच्यातल्या त्या कचकचीत, ढिगभर बियाच बघत असतो येता-जाता. आणि त्या बियांनाच पेरू समजून बसतो. हळूहळू  तक्रारी सुरु होतात, तेव्हा त्याहीपलीकडे त्या पदार्थाला अर्थ देणारं अजुनही काहीतरी त्यात असतं हे आपण विसरूनच जातो. आणि त्याच्यापुढे जाऊन ती व्यक्तीच त्रासदायक असल्याचा गैरसमज आपण डोक्यात ठेवतो. एवढंच नव्हे तर तिला न आवडणाऱ्या गोष्टींच्या यादीत सरकवून मोकळे होतो.
          खरं तर ही यादी वाढवण्याआधी एकदा स्वतःला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की, समोरची गोष्ट असो वा व्यक्ती; न आवडण्यामागचं कारण काय?... चव आवडत नाही म्हणून की, त्याचा आस्वाद नेमका घ्यायचा कसा हे आपल्याला अवगत नाही म्हणून...
          काय मग... करताय ना विचार? तेवढंच या पेरूला समाधान... एक विचार पेरल्याचं!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

दुसरी बाजू

कलेक्शन