गुलमोहर

          गुलमोहर म्हणजे निसर्गाचा एक आविष्कारच... नाही का? केशरी रंगांची त्याने केलेली उधळण पहिली की मन भरुन जातं. आणि निसर्गाच्या किमयेचं अप्रुप वाटत राहतं. त्याच्या छटांवरून नजरच हटत नाही. मार्च ते मे दरम्यान सगळीकडे झाडे वाळून जातात तेव्हा हा डौलाने बहरतो आणि इतरांची उणीव भरून काढतो. येणाऱ्या जाणाऱ्या वाटाड्यांना सावली देऊन, विसावा देऊन त्यांना आपलंसं करतो. एक प्रकारे आपल्या गरजेच्या वेळी नकळत आपला आधारच होऊन जातो. बरेच जण बऱ्याचदा गुलमोहराविषयी लिहितात, रेखाटतात... त्याच्या छटा लेखणीतून, कुंचल्यातून जगासमोर पसरतात! तरीही परत परत लिहावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं त्याविषयी; प्रत्येक वेळी तो नव्याने दिसतो आणि उमगतो देखील!
           पण याच गुलमोहराकडे आज एका नव्या दृष्टीने बघायचं का आपण? जगभरामध्ये कितीतरी कला आपण पाहतो. त्यातल्याच काही आपल्यातही लपलेल्या असतात. त्या इतरवेळी कधीच दिसून येत नाहीत पण आयुष्याच्या रखरखत्या उन्हांत त्या आपल्या रंगांची उत्स्फूर्तपणे उधळण करतात व गरजेच्या वेळी आपला आधार बनतात. प्रत्येक क्षणाला 'आनंदी उद्याची' चाहूल देत आपल्या मनात आशेचे, उमेदीचे अनोखे रंग भरतात. त्यांच्या असण्यानेच आयुष्याकडे नव्याने बघण्याचा, उभं राहण्याचा उत्साह आपल्यात संचारतो. अगदी गुलमोहराच्या सळसळत्या पानांसारखा! आलेली परिस्थिती निघून जाईपर्यंत त्यांच्या सावलीची सोबत देतात.
          गुलमोहरासारखं असणारं त्यांचं सौंदर्य न्याहाळायला फक्त योग्य दृष्टी हवी. आणि अशी दृष्टी जोपासून आपण स्वतःमधला गुलमोहर शोधायला हवा जो प्रेमात पडेल, पुन्हा- पुन्हा, नव्यानं; स्वतःलाही आणि इतरांनाही...!

Comments

  1. Looks like you found Gulmohar one within you and one for you.. you got amazing talent, keep it up.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पेरू

दुसरी बाजू

कलेक्शन