गुरू

          पावसाळा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो हिरवागार निसर्ग! चैत्रात फुटलेली पालवी बहरते आणि सगळीकडे चैतन्य पसरतं. डोंगरदऱ्या, शेत, रस्ते सगळीकडे हिरवळ दिसू लागते. झाडाझुडुपांची ऊन-पाऊस मिळवण्यासाठी चढाओढ सुरु होते. प्रत्येक पालवी 'सक्षम' होताना दिसते. सक्षम... देण्यासाठी; इतरांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी! 'झाड' ही निसर्गाची एक आदभुत निर्मितीच म्हणायला हवी. रंग, आकार, गुणधर्म यांच्या प्रचंड विविधतेने नटलेल्या झाडाचा जन्मच मुळी 'देण्यासाठी' झालेला असतो. फळ, फुल, पान, सावली, सुगंध अशा विविध गोष्टी जेवढ्या आणि जशा जमतील तशा ते समोरच्याला देण्याचा प्रयत्न करतं. जणू 'देणं' हा त्याच्या  अस्तित्वाचा अविभाज्य घटकच असतो. आपल्याकडे असलेलं चांगलं समोरच्याला देऊन त्याला समाधानी आणि परिपुर्ण बनवणं हा कदाचित त्यांच्या आयुष्याचा मूळ उद्देश असावा, आणि हे साध्य करण्यासाठी त्यांचं काम अविरतपणे चालू असतं.
          आपले गुरु म्हणजे असंच भरभरून दातृत्व लाभलेलं एखादं झाडच नव्हे का?  ज्ञान, कला, कल्पकता, उत्साह यांच्या विविधतेने सजलेलं एक झाड! ज्ञानाचं फळ, आत्मविश्वासाचं फुल, मायेची सावली, आणि विवेकाचा सुगंध अशा विविध गोष्टींचा खजिना ते आपल्या शिष्याला अगदी सहजतेने उपलब्ध करून देतात. त्याला परिपुर्ण बनवणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय असतं. शाळेत, शाळेबाहेर आपल्याकडे आलेल्या पालवीला बहरायला मदतीचा हात देणं; त्यांना इतारांच्या उपयोगी पडण्यासाठी सक्षम बनवणं हे काम ते मोठ्या धीराने, अविरतपणे करत असतात. याहीपलीकडे एक गुरु म्हणून त्यांचा प्रवास फक्त झाड बनवण्यापर्यंतच मर्यादित रहात नाही तर ते आपल्या प्रत्येक शिष्याला झाडापेक्षाही उंच बनवण्यासाठी प्रयत्नशील राहतात. म्हणूनच झाड आणि गुरु यांच्या दातृत्वाने त्यांना प्राप्त झालेली उंची आकाशालाही मागे टाकते.
          अशा वनराईचा, गुरुवृंदांचा सहवास आयुष्यभर आपल्याला लाभणं म्हणजे पर्वणीच म्हणायला हवी. त्यांच्याशी असलेला आपला ऋणानुबंध आपल्या आयुष्याला एक नवी उंची देतो. त्यामुळेच त्यांच्या दातृत्त्वाने आपल्या मनातल्या सकारात्मक रोपट्यांना कायम जिवंत ठेवणाऱ्या  आणि पालवीपासून झाडापर्यंतच्या प्रवासात सातत्याने पाठीशी असणाऱ्या सर्व गुरूवर्यांना शतशः अभिवादन!     

Comments

Popular posts from this blog

पेरू

दुसरी बाजू

कलेक्शन